spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदेश झाले, आश्वासनही मिळाले… पण चौकशी अहवाल अजून कुठे?

– नागरिकांच्या तक्रारीला न्याय कधी? दोन महिन्यांपासून चौकशी रखडली

यासीन शेख, गोंदिया आमगाव :- तालुक्यातील ग्रामपंचायत बाम्हणी येथे झालेल्या विविध विकासकामांमधील कथित भ्रष्टाचार व आर्थिक अनियमिततेबाबत पीजी पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी अद्याप पूर्ण न झाल्याने पंचायत समिती आमगाव व संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदेश देऊनही दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही चौकशी अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नसल्याने प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती आमगाव येथील गट विकास अधिकाऱ्यांनी दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी संबंधित विभागांना स्पष्ट आदेश देत अवघ्या सात दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तक्रारदार छगनलाल भेदे यांनी सन २०२० ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत पीजी पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.

मात्र आदेशानंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही चौकशी अहवाल अद्यापही सादर करण्यात आलेला नाही. लघु पाटबंधारे विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी अथवा तपासणीच केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ औपचारिक चौकशी करून प्रकरण थंडबस्त्यात टाकल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पंचायत समिती आमगाव येथील विस्तार अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत कोणताही अधिकृत अहवाल तक्रारदाराला देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत असून, नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाच्या तक्रार निवारण प्रणालीवर विश्वास ठेवून नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतरही वेळेत न्याय मिळत नसेल, तर ही व्यवस्था केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, चौकशी अहवाल तात्काळ जाहीर न केल्यास तक्रारदारांकडून लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यासोबतच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशी अहवाल कधी समोर येतो, याकडे आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

“ग्रामपंचायत बाम्हणी येथील विकासकामांबाबत पीजी पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काही कामे विविध विभागांशी संबंधित असल्यामुळे तांत्रिक तपासणीसाठी वेळ लागत आहे. सर्व संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त होताच वस्तुनिष्ठ पडताळणी करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल व कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. तक्रारदारांना न्याय मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. ”

   – एन. बी. गट्टूवार  गटविकास अधिकारी, प.स. आमगांव.

“ग्रामपंचायत बाम्हणीतील विकासकामांमधील कथित अनियमिततेबाबत मी शासनाच्या पीजी पोर्टलवर विश्वास ठेवून तक्रार दाखल केली होती. गट विकास अधिकाऱ्यांनी सात दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते, मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही. संबंधित विभागांकडून चौकशी लांबवली जात असल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. जर लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून अहवाल जाहीर करण्यात आला नाही, तर न्याय मिळवण्यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय आम्ही स्वीकारू.”

    – छगनलाल भेदे  तक्रारदार, बाम्हणी

Popular Articles