– लाखापूरचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांचे घवघवीत यश
– निवडून आलेल्या निवडक ४० स्पर्धकांनी सहभाग
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय विविध क्रीडा व कलाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन राज्य शासनामार्फत करण्यात आले होते. सदर स्पर्धेमधील वादविवाद या स्पर्धा प्रकारात रामटेक पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखापुरचे मुख्याध्यापक सचिन नाना पाटील यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून रामटेक पंचायत समितीचे व नागपूर विभागाचे नाव उंचावले आहे.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, वाशिम येथे वादविवाद स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी पार पडली, सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून, विभाग स्तरावरून निवडून आलेल्या निवडक ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या अशा झालेल्या या वादविवाद स्पर्धेमध्ये केंद्रस्तर, रामटेक तालुकास्तर, जिल्हास्तर व विभाग स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या सचिन नाना पाटील यांनी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले आणि संपूर्ण राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांमधून सदर वादविवाद स्पर्धेत आपल्या वक्तृत्वाची व ज्ञानाची अनोखी छाप सोडत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. “शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर तारक” या विषयाच्या अनुकूल बाजूने आपले मत प्रदर्शित करत उपस्थिताची व परीक्षकाची मने जिंकली. आपल्या अनोख्या सादरीकरण शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत सचिन पाटील यांनी द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले. तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर यशस्वी कामगिरी करत राज्यस्तरावरही नागपूर विभाग व रामटेक पंचायत समितीला नावलौकिक प्राप्त करून दिल्याबद्दल नागपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी निखिल भुयार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य बुराडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता शंखदरबार, रामटेक चे गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे, विस्तार अधिकारी रामटेके व नंदेश्वर सर्व केंद्रप्रमुख व रामटेक मधील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सचिन पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सचिन नाना पाटील यांना या विजयाबद्दल लवकरच पुणे येथील समारंभात शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते समानित करण्यात येणार आहे. रामटेक पंचायत समितीचे व नागपूर विभागाचे नाव लौकिक वाढवावे असा आशावाद व्यक्त करत शिक्षण विस्तार अधिकारी मंजुषा नंदेश्वर यांनी सचिन पाटील यांचे कौतुक केले आहे.
विविध उपक्रमात कार्यरत
सचिन पाटील मूळचे जळगाव खानदेशातील असून पवित्र पोर्टल मधून त्यांची निवड नागपूर जिल्ह्यातील रामटेक पंचायत समिती अंतर्गत शिक्षक म्हणून झालेली आहे. अल्पावधीतच सचिन पाटील यांनी आपल्या ज्ञानाच्या, वकृत्वाच्या व कार्यकुशलतेच्या जोरावर आपले वेगळे अस्तित्व रामटेकच्या शिक्षण क्षेत्रात प्रस्थापित केलें आहे. उपक्रमशील, तंत्रस्नेही, मितभाषी ॲक्टिव्ह शिक्षक म्हणून सचिन पाटील यांनी आपली वेगळी ओळख अल्पावधीत निर्माण केली आहे. मागील वर्षी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रवीनगर नागपूर मार्फतही सचिन पाटील यांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून लॅपटॉप भेट देऊन सन्मान करण्यात आला होता. शासनाच्या विविध उपक्रमात तसेच आपण कार्यरत असलेल्या शाळेवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात सचिन पाटील यांचा हातखंडा आहे. सध्या सचिन पाटील हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लाखापुर या ठिकाणी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळत आहेत.








