spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेटाळा खून प्रकरणाचा पर्दाफाश! सासू आणि मेहुण्यानेच दिली होती ३० हजारांची ‘सुपारी’; पाच आरोपींना पोलीस कोठडी

– लग्नाचा राग मनात धरून जावयाचा काटा काढला; मोहाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हंसराज, प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे घडलेल्या आकाश शेंडे या तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे. प्रेमविवाहाचा राग मनात धरून सासू आणि मेहुण्यानेच ३० हजार रुपयांची सुपारी देऊन आकाशचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बेटाळा येथील रहिवासी आकाश शालिक शेंडे (वय ३०) याने ६ जानेवारी २०२६ रोजी गावातीलच अंजू रमेश कुंभलकर यांच्या मुलीशी लग्न केले होते. मात्र, या लग्नाला मुलीची आई अंजू कुंभलकर आणि भाऊ चेतन कुंभलकर यांचा तीव्र विरोध होता. याच रागातून त्यांनी आकाशचा काटा काढण्याचे कारस्थान रचले.

तपासादरम्यान समोर आले की, आरोपी सासू अंजू कुंभलकर आणि मेहुणा चेतन कुंभलकर यांनी आकाशचा खून करण्यासाठी गावातीलच महेंद्र बोरकर याला ३० हजार रुपयांची सुपारी दिली होती. यापैकी ६ हजार रुपये २४ जानेवारी रोजी आगाऊ (अॅडव्हान्स) देण्यात आले होते.

२५ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास, आकाशचा मित्र भारत मोहतुरे याने कटानुसार आकाशला फोन करून गावातील चौकात बोलावले. तिथून त्याला स्वतःच्या दुचाकीवर बसवून ‘ नाल्या’कडे नेले. तिथे आधीच दबा धरून बसलेले महेंद्र बोरकर आणि दिनेश उर्फ सचिन ईश्वरकर यांनी भारतच्या मदतीने आकाशचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. २६ जानेवारी रोजी सकाळी आकाशचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

मृताचा चुलत भाऊ प्रकाश शेंडे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाचही आरोपींना अटक केली.

भारत बाळकृष्ण मोहतुरे (वय २६)

महेंद्र बकाराम बोरकर (वय ३१)

दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (वय ३७)

अंजू रमेश कुंभलकर (वय ४२ – सासू)

चेतन रमेश कुंभलकर (वय २२ – मेहुणा)

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे सुपारी देऊन खून करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

Popular Articles