मुंबई २१ : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून मोठा गौप्यस्फोट झाला असून, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ४ मंत्री आणि ४ खासदार हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले असल्याचा दावा करत राज्यात खळबळ माजवली आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर पोस्ट करून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात ‘हनी ट्रॅप’ प्रकरण अस्तित्वात नसल्याचे सांगितले असताना, राऊतांनी त्यांच्या दाव्याला विरोध करत फोटोसह ट्विट करत सीबीआयमार्फत सखोल चौकशीची मागणी केली. या चौकशीतून सत्य समोर येईल आणि कोण खरे, कोण खोटे हे स्पष्ट होईल, असे राऊत म्हणाले. या कथित रॅकेटमध्ये फक्त चार मंत्रीच नव्हे तर अनेक वरिष्ठ अधिकारी व खासदारांचा समावेश असून, शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले काही तरुण खासदारही हनी ट्रॅपमुळे पक्ष सोडायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या दाव्यांमध्ये तथ्य आढळल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.