मुंबई २१ : २००६ साली मुंबई लोकल रेल्वेमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व ११ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात निर्दोष मुक्त केलं. सुमारे १९ वर्षांनंतर आलेल्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांवर आणि साक्षींच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ११ जुलै २००६ रोजी अवघ्या ११ मिनिटांत सात स्फोट झाले होते, ज्यामध्ये २०९ जणांचा मृत्यू तर ८०० हून अधिकजण जखमी झाले होते. २०१५ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने १३ आरोपींपैकी १२ आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; यामधील एका आरोपीचा मृत्यू झाल्याने उर्वरित ११ आरोपींनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. कोर्टाने स्पष्ट केलं की आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणांना अपयश आलं असून, स्फोटाच्या १०० दिवसांनंतर साक्ष देणाऱ्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही. याशिवाय स्फोटकांचे प्रकार, सापडलेल्या बॉम्ब, बंदुका आणि नकाशे यामध्ये कोणताही ठोस संबंध आढळून आलेला नाही. काही आरोपींनी पोलिसांकडून जबरदस्तीने जबाब नोंदवल्याचा आरोप केला होता, ज्यावरून न्यायालयाने तपास प्रक्रियेवरच शंका व्यक्त केली. येरवडा, नाशिक, नागपूर आणि अमरावती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीत सहभागी झालेल्या आरोपींनी निर्दोष मुक्ततेनंतर आनंद व्यक्त केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरोपी मुक्त झाले असले तरी या स्फोटांत मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांच्या न्यायप्राप्तीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिल्याची भावना समाजात उमटू लागली आहे.