मुंबई २१ : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून, भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणात ७२ हून अधिक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, हे प्रकरण आता जळगावपर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह दाखवत हा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल्ल लोढा, जे मूळचे जामनेरचे असून, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केले होते, त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉक्सो, बलात्कार आणि हनीट्रॅप संबंधित दोन गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाण्यातही त्यांच्या विरोधात पॉक्सो आणि खंडणीसंबंधी तक्रार दाखल झाली होती. ५ जुलै रोजी साकीनाका पोलिसांनी त्यांना चकाला येथील लोढा हाऊस येथून अटक केली. तक्रारीनुसार, लोढा यांनी १६ वर्षांची एक मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या सोबत गैरवर्तन केले, त्यांचे अश्लील फोटो काढले आणि दोघींना धमकावून लोढा हाऊसमध्ये बंद केल्याचे गंभीर आरोप आहेत. अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्या जळगाव, जामनेर आणि पहूर येथील मालमत्तांवर छापे टाकून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. लोढा यांचा कधीकाळी जळगावमधील एका प्रभावशाली नेत्याशी घनिष्ठ संबंध होता, मात्र नंतर त्यांनी त्यांच्यावरच गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवली होती, जी पाच दिवसांत परत घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पूर्वी ते मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधक होते, मात्र कालांतराने ते त्यांचे कट्टर समर्थक झाले. सध्या ते हनीट्रॅप प्रकरणात अडकले असून, नाशिक प्रकरणातील संशयित ७२ अधिकाऱ्यांमध्ये जळगावचे एक माजी राजकारणी आणि दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस हे सर्व धागेदोरे तपासून या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा यांचा नेमका संबंध काय आहे, याची चौकशी करत आहेत.