यवतमाळ, दि.२१ : कोणत्या वयात कोणता आजार होईल सांगता येत नाही. अशा आजारांवर फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हा खर्च सर्वसामान्य गरीब रुग्णांना परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्यावतीने अर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यासह राज्यात हजारो रुग्णांना कक्षाने मदतीचा हात दिला आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून रुग्णांना या कक्षाची मदत होत आहे.
मुख्यमंत्री सहायता कक्षाची आर्थिक मदत मिळण्यासाठी रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. रुग्णाच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. तसेच रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिक असावे.
जिल्हास्तरीय कक्षाचे कामकाज : जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने रुग्ण अर्जदाराला अर्ज भरुन दिला जातो. रुग्णांच्या आजाराचे निदान, सर्व आवश्यक रक्त तपासनी व इतर आजारासंबंची अहवाल पडताळणी केली जाते. संबंधित रुग्णालय व डॉक्टरांकडून खर्चाचे अंदाजपत्रक घेतले जाते. आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबईच्या aao.cmrf-mh@gov.in या ईमेलवर पाठविला जातो. प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर निधी थेट रुग्णालयास वर्ग केला जातो.
धर्मादाय रुग्णालय निधी : धर्मादाय रुग्णालय निधीचा लाभ मिळण्यासाठी रुग्णाने दारिद्यरेषेखालील, अंत्योदय कार्ड तसेच शासकीय ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णाने सादर केलेल्या अर्जाची 48 तासात पडताळणी करून अर्ज सादर केला जातो. जिल्हा मदत कक्षाच्यावतीने 72 तासाच्या आत मान्यता देऊन धर्मादाय रुग्णालयातून खाट उपलब्ध करुन दिल्याबाबतचे मान्यता पत्र रुग्णास कळविले जातात. त्यानंतर रुग्णास रुग्णालयात दाखल करण्याबाबत कक्षामार्फत सहाय्यता करण्यात येते. रुग्ण रुग्णालयातून डिस्चार्ज होईपर्यंत कक्षातील अधिकारी, कर्मचारी रुग्णाच्या संपर्कात राहतात.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र : विहीत नमुन्यातील अर्ज, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकिय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांद्वारे प्रमाणित करुन घेतले असावे. चालू वर्षाचा 1 लाख 60 हजार पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रुग्ण दाखल असल्यास रुग्णाचा फोटो, रुग्णांचे आधारकार्ड, लहान बालकाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधारकार्ड, रुग्णांचे रेशनकार्ड, संबंधित आजारांचे संबंधित अहवाल असणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक आहे. प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी, शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. रुग्यालायाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असणे आवश्यक आहे.
अर्थसहाय्यासाठी विकार, आजारांची यादी : कॉकलियर इम्प्लांट, अंतस्त कर्णरोपण शस्त्रक्रिया वय 2 वे 6 वर्ष, हृदय प्रत्यारोपण, यकृत्र प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदुचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विघुत जळीत रुग्ण आदी उपचार, शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
कक्षाचा लाभ घेण्यासाठी रुग्ण कक्षाशी संपर्क साधू शकतात. तसेच 18001232211 या टोल फ्री कमांकावर देखील संपर्क साधता येतो. रुग्ण स्वतः cmrf.maharashtra.gov.in या पोर्टलवर अर्ज करु शकतात.