आमदार अभिजित वंजारी यांचा विधानपरिषदेत मुद्दा
मुंबई/नागपूर १९ : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जमीन खरेदीच्या व्यवहारात झालेल्या अनियमिततेचा मुद्दा आमदार अभिजित वंजारी यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला.
विधान परिषदेत बोलताना आमदार वंजारी यांनी स्पष्ट केले की, छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या गरजेसाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी प्रक्रियेमध्ये नियमबाह्य निर्णय घेण्यात आले आहेत. बाजार समितीच्या निधीचा गैरवापर होत असून, वास्तविक बाजारभावापेक्षा अधिक किंमतीला जमीन खरेदी करण्यात आली आहे.
या व्यवहारात संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी परस्पर संगनमत करून आर्थिक लाभ मिळविला असल्याचा आरोप आमदार वंजारी यांनी केला. या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारने यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन तातडीने चौकशी समिती नेमावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील आ. वंजारी यांनी केली.