खापा, २१ : खापा स्थित जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे खापा शहरात भव्य अशा वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. वृक्षदिंडी मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झालेले होते. यामध्ये बैलगाडीसह संत दिंडी, कलश पथक, लेझीम पथक बँड पथक सह विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. दिंडीचे उद्घाटन शाळा समिती सदस्य प्रज्ञाताई बुरडे व सुरेशराव मारोतकर, माजी मुख्याध्यापक सुरेंद्र गभने व गावातील प्रतिष्ठ नागरिक मुकेश गायधने यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाच्या पटांगणात चव्हाण मॅडम पोलीस उपनिरीक्षक खापा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून “एक पेड मा के नाम” या हॅशटॅक नुसार संपूर्ण दिंडीचे संचालन करण्यात आलेले होते. दिंडी खापा येथील जिजामाता विद्यालयातून नवीन वस्ती, महाकवी सुधाकर गायधनी उद्यान या मार्गे खापा माईनकडे मार्गस्थ होत असताना रस्त्यामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करून या वृक्षदिंडी द्वारे पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक घोषवाक्याने परिसर दणाणून सोडलेला होता. आज मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावावर झाडांची कत्तल होत असल्यामुळे विकास हा आवश्यक आहे पण तो पर्यावरण पूरक असावा असा मोलाचा संदेश वृक्षदिंडीचे संचालन करताना महाविद्यालयाचे प्राध्यापक देवेंद्र धुंदे यांनी दिला. खापा वासियांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे व समाजापर्यंत पर्यावरणाची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने विद्यालयाचे प्राचार्य सुधाकर गजभिये यांनी या वृक्षदिंडीचे आयोजन केलेले होते. यावेळी दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी होते. वृक्षदिंडी चे स्वरूप व दिंडीतील विविध पथके बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी उसळलेली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षा व ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा यावेळी उपलब्ध होता.
या वृक्षदिंडीला यशस्वी करण्यामध्ये विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 5 ते 12 पर्यंतचे सर्व विद्यार्थी व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र भोंगाडे, मुक्ता कडू, उमेश चौरे, भारती कुंमरे, वर्षा शेलोकर, पल्लवी धुव्वाधप्पार,पल्लवी वलके पंकज बावनकर, रचना मोहने, प्रफुल्ल कुमार वडे, आनंद मेनकुदळे, मृत्युंजय सिंग, आनंद गजभिये, लिखिता सहारे यांनी परिश्रम घेतले.