कन्हान २१ :प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी असतानाही शहरात त्याचा सर्रास वापर सुरू आहे. कन्हान-पिपरी न.प. मुख्याधिकारी दीपक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.18 जुलै) नगर परिषद क्षेत्रातील आठवडी बाजारात व्यावसायिकांच्या, दुकानदारांच्या, पथविक्रेते अश्या विविध व्यावसायिकाच्या दुकानातून प्लास्टिक वापर करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई व प्लास्टिक जप्त केल्याने अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईत एकूण 12 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पर्यावरणाला आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या तसेच पावसाळ्यात पाणी साचण्यास कारणीभूत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक यापूर्वीच प्रतिबंधित केले होते. आता केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी घातली आहे. शासनाच्या सुधारणा अधिसूचना 2010 नुसारही ही बंदी संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. नियम असूनही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतरही प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याने नगरपरिषदेने ही कारवाई केली.
या कारवाईत स्वच्छता अभियंता आशिष आखाडे, लेखापाल नितेश तपासे, लेखा परीक्षक प्रवीण पवार, शहर समन्वयक मयूर डफरे, लिपिक देवीलाल ठाकूर, राष्ट्रपाल नितनवरे, बंटी खिचर, नेहाल बढेल, गौरव गिरडकर, आकाश गिरडकर, पीयूष नितनवरे, गुलशन कटकवार, तेजस बोबडे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.