नागपूर २१ : “रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा उभा राहावा, यासाठी आम्ही ज्येष्ठ मंडळी त्याची मुळे बनण्यास तयार आहोत, तुम्ही तरुण झाड बना,” असा जोरदार एल्गार ‘दि रिपब्लिकन’च्या प्रशिक्षण शिबिरात वक्त्यांनी केला. रविवारी आमदार निवास येथे ‘दि रिपब्लिकन’ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम होते. प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ.एन.व्ही.ढोके, माजी सनदी अधिकारी ॲड. किशोर गजभिये आणि संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन ढोके व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन ढोके म्हणाले, “नागपुरात अनेक ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत, पदाधिकारी आजही आहेत. मात्र समन्वयाच्या अभावामुळे पक्ष उभा राहत नाही. हे सर्वजण जर पक्षाची मुळे होण्यासाठी तयार असतील, तर आम्ही तरुण झाड बनून त्यांना सावली देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.” प्रा.डॉ.एन.व्ही.ढोके यांनी अनेक वर्षांपासून ‘दि रिपब्लिकन’च्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीचा आढावा घेत, “आजचे तरुण विचारधारेशी प्रामाणिक राहिले तरच खरी परिवर्तनाची लाट उठू शकते. आम्ही मुळे बनतो, तुम्ही झाड व्हा,” असे आवाहन उपस्थित तरुणांना केले. ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम म्हणाले, “नेतृत्वाशिवाय कोणतीही चळवळ उभी राहत नाही. लोकांचे मन जिंकण्याची क्षमता असणारे नेतृत्वच रिपब्लिकन चळवळीला बळ देऊ शकते. ‘दि रिपब्लिकन’च्या प्रशिक्षण उपक्रमाचे विशेष कौतुक त्यांनी यावेळी केले.” नवीन इंदूरकर यांनी विचार मांडताना सांगितले की, “विचारवंत, लेखक म्हणून कोणीही मोठा असो, पण तो संघटनेतून कृतीशील योगदान देत नसेल, तर त्याचा उपयोग समाजाला होत नाही.” माजी सनदी अधिकारी ॲड. किशोर गजभिये यांनी राजकीय उदासीनतेमुळे समाजाला होणाऱ्या नुकसानीची उदाहरणे देत स्पष्ट केले की, “रिपब्लिकन विचारांच्या लोकांनी आता खुले रस्ते, चौक, मैदाने यावर लढाई लढावी. ‘दि रिपब्लिकन’ संघटना ही त्यासाठी मागे उभी आहे.” कार्यक्रमाचे संचालन हिंगणघाटचे सामाजिक कार्यकर्ते नवीन इंदूरकर यांनी केले. तर आभार नाट्यकलावंत वंदना जीवने यांनी मानले. या उपक्रमात संतोष शिवणकर, सुचेंद्र मंडपे, अरविंद थोरात, आरती टेंभुरकर, प्रफुल्ल गजभिये, रवी ढोके, विक्रांत गडपायले यांचे विशेष सहकार्य लाभले.