राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर
नागपूर, दि. २१ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यापर्यंत योजना पोहोचाव्या यासाठी 22 जुलै रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत टिंबर मार्केट परिसरातील पाटीदार भवन येथे लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रवी भवन येथे झालेला पत्रकार परिषदेला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर दयाशंकर तिवारी, प्रमुख अतिथी म्हणून आ. संदीप जोशी, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वितरण तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून205 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महानगरपालिका, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य लाभले असल्याची माहिती डागोर यांनी दिली.